जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही! : प्रताप सरनाईक


मुंबई : कलर्स वाहिनीवर सुरू असलेले ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सध्या एका नव्या वादामुळे चर्चेत आले आहे. घरातील स्पर्धक आणि प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने ‘मला मराठीची चीड येते’, असे म्हणत ‘मराठी’ भाषेचा अपमान केला आहे. यानंतर आता सगळ्याच स्तरांतून त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील आता जानला या स्पर्धेतून वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे.


‘बिग बॉस’च्या 14व्या पर्वाच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागांत त्यात सहभागी असलेली स्पर्धक दुसऱ्या प्रतिस्पर्ध्या सोबत मराठी भाषेत संवाद साधत असताना अत्यंत मुजोर, मराठी द्वेष्टा जान कुमार सानू नावाच्या प्रतिस्पर्ध्याने तिला तू मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल, असे सांगत अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडा ओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर, मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे.