मास्क न लावता फिरणाऱ्याच्या विरुद्ध कारवाईत मुंबई महापलिके कडून ३ कोटी च्या वर दंड वसूल करण्यात आला आहे.


मुंबई : राज्य सरकारच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तीला मास्क वापर बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क वापर न करणाऱ्यांविरुद्ध 9 एप्रिलपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला हा दंड 1000 रुपये होता, तो आता 200 आकारला जात आहे.


मुंबई महापालिकेच्या ‘परिमंडळ-1’मधील नरिमन पॉइंट, कुलाबा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार, पायधुनी, काळबादेवी, गिरगाव, भायखळा, माझगाव या भागात सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे. या विभागांत तब्बल 28 हजार 292 नागरिकांवर कारवाई करून 65 लाख 56 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.




त्याखालोखाल चेंबूर (एम-पश्चिाम विभाग), कुर्ला (एल), गोवंडी (एम-पूर्व) या भागांत 21 हजार 312 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 47 लाख 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पालिकेच्या अन्य चार परिमंडळांमध्ये 20 हजारांहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी पश्चिम परिसरात सर्वाधिक म्हणजे आठ हजार 890 नागरिकांकडून दंडवसुली करण्यात आली आहे.


विनामास्क फिरणारांवर पोलिसांच्या मदतीनं कारवाई


‘विना मास्क’ विषयक दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलीस दल व वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई नियमितपणे करण्यात येणार. यासाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या स्तरावर ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, प्रभात फेरीला (मॉर्निंग वॉक) जाणारे नागरिक इत्यादींवर देखील ‘विना मास्क’ विषयक कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.