शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंगेरमधील हिंसाचारवरून भाजपा आणि राज्यपालांवर निशाणा साधला



पण सगळेच जण त्याच्यावरती गप्प आहेत. जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात आणि बिहारमध्ये जे निवडणुका लढवता आहेत. ते सगळे कसे गप्प आहेत.





मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंगेरमधील हिंसाचारवरून भाजपा आणि राज्यपालांवर निशाणा साधला आहे. मुंगेरमधील हिंसाचार अजून थांबलेला नाही आहे. पण सगळेच जण त्याच्यावरती गप्प आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. (Sanjay Raut On Governor)


बिहारमध्ये निवडणुका सुरू आहेत. मुंगेरमध्ये दुर्गामातेच्या विसर्जनाच्या यात्रेत हिंसाचार झाला, दंगल झाली, त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये एक तरुण मारला गेला आणि अनेक लोक जखमी झाले. मुंगेर आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. हिंसाचार अजून थांबलेला नाही. पण सगळेच जण त्याच्यावरती गप्प आहेत. जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात आणि बिहारमध्ये जे निवडणुका लढवता आहेत. ते सगळे कसे गप्प आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.


अशा प्रकारचा दुर्गामातेवरच्या पूजेवरचा एखादा हल्ला किंवा गोळीबार महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा अन्य राज्यात झाला असता, जिथे विरोधकांची सरकारं आहे, तर केवढा मोठा गदारोळ झाला असता, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, पश्चिम बंगालला राष्ट्रपती राजवट लावा, अशा प्रकारची मागणी झाली असती, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी बिहारच्या राज्यपालांना फोन करून सांगायला पाहिजे. तुम्ही ताबडतोब कारवाई करा. तिथलं सरकार सेक्युलर आहे का?, हिंदुत्ववादी नाही आहे का?, हा प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे, असाही टोला संजय राऊतांनी राज्यापालांना हाणला आहे.


तसेच पाकिस्तानच्या खासदारानं पुलवामा हल्ला पाकपुरस्कृत असल्याचा दाव्यालाही संजय राऊतांनी दुजोरा दिला आहे. पाकिस्तान सरकारचा त्यात आहे हे आम्ही पहिल्यापासूनच बोलतोय. पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना ज्या काश्मीरमधून ऑपरेट होतात. त्यांच्याशिवाय तर हे होऊ शकत नाही. एवढा मोठा हल्ला झाला आहे. आपले 40हून अधिक जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आपण त्याचा बदलाही घेतला आहे. सर्जिकल स्ट्राइक केले आहे. पाकिस्तानच्या खासदारानं जे म्हटलेलं आहे ते खरं आहे, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलं आहे.