भीक घ्या, वीज द्या - मनसेचे अनोखे आंदोलन


भीक घ्या, वीज द्या - मनसेचे अनोखे आंदोलन


अंबरनाथ


लॉकडाऊनच्या कालावधीत वीज कार्यालयामार्फत ग्राहकांना वीजेची बिले सरासरी दराने पाठवण्यात आली होती. ग्राहकांनी आलेली बीले भरली तरीसुद्धा वीज मंडळाने पुन्हा अवाजवी बिले पाठवली होती. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या नेतृत्वाखाली  बुधवारी २२ जुलै रोजी वीज मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात येऊन टीव्ही फोडून निषेध केला तसेच भीक मागो आंदोलन केले. यावेळी शहर सरचिटणीस अविनाश सुरसे, मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव, युसूफ शेख, बबलू खान, संदीप भोईर, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक घरी असून त्यांना या महिन्यात १२ ते १५ हजार अशी वीज बिले आली आहेत. पगार वेळेवर होत नाहीत. अशावेळी बिले भरणार कशी असा सवाल श्री. भोईर यांनी वीज अधिकाऱ्यांना विचारला. जोपर्यंत वीज बिलाबाबत सन्मान्य तोडगा निघत नाही  तोपर्यंत बिल भरू नये, असे आवाहन श्री. भोईर यांनी नागरिकांना केले. बिल भरले नाही म्हणून वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न वीज कर्मचाऱ्याकडून  झाल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशाराही श्री.भोईर यांनी वीज खात्याला दिला. भीक घ्या, वीज द्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.