ठामपाच्या मालमत्ता कर विभागाला ६५० कोटींचे उद्दीष्ट
ठाणे:
कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने २२ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केला. तेव्हापासून ठाणे महानगर पालिकेची करवसुली थांबली होती, त्यामुळे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. शहरात सुमारे साडेचार लाख मालमत्ताधारक आहेत. यावर्षी मालमत्ता कर विभागाला ६५० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.ही वसुली करण्याचे मोठे आव्हान या विभागासमोर आहे.
कर वसुली जलद गतीने व्हावी यासाठी ठामपाच्या वतीने मालमत्ता कर भरणाऱ्या करधारकांना १० टक्के सूट देण्याची योजना जाहीर करण्यात आली, परंतु मालमत्ता करांची देयके मालमत्ता करधारकांना मिळाली नाहीत. त्यामुळे ऑनलाइन कर भरणा करण्यास प्राधान्य देण्यात आले. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करभरणा करणाऱ्याला अडचण आली तर महापालिकेचे अधिकारी मार्गदर्शन करतात. काही मिनिटात कर भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत असल्याने अनेक ग्राहकांनी ऑनलाइन करभरणा करण्याला पसंती दिली आहे, त्यामुळे दरदिवशी एक कोटींचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे, त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.