डॉ. आव्हाडांच्या मदतीमुळे महिला बचावली

दहा दिवस व्हेंटीलेटरवर राहूनही महिलने केला कोरोनाचा पराभव
डॉ. आव्हाडांच्या मदतीमुळे महिला बचावली



ठाणे


सध्या कोरोनामुळे श्वास गुरदमरुन अनेकजण आपले प्राण सोडत असतानाचा एका महिलेने चक्क दहा दिवस व्हेटिंलेटरवर राहून कोरोनाचा पराभव केला आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आयत्यावेळी रेमडिसिव्हीर हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिल्यामुळे जवळपास आशा सोडलेल्या या महिलेचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. 20 दिवसानंतर ही महिला घरी परतली आहे.
छातीमध्ये थोडा त्रास होत असल्याने चंदनवाडी येथे राहणार्‍या रुपाली राजू चापले (46) यांना नौपाडा येथील होरायझन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांची कोविड टेस्ट केली. त्यामध्ये त्या कोरोनाबाधीत असल्याचे आढळले. मात्र, शहरातील अनेक कोविड रुग्णालयांमध्ये विचारणा करुनही बेड उपलब्ध होत नसल्याने अखेरीस रुपाली यांचे पती राजू चापले यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष आनंद परांजपे यांच्याशी संपर्क साधला. परांजपे यांनीदेखील मेडीकल असोशियनचे डॉ. संतोष कदम आणि लाईफ केअर हास्पीटलचे डॉ. सुशील इंदोरिया यांच्याशी संपर्क साधून रुपाली चापले यांना 21 जून रोजी लाईफ केअर हास्पीटलमध्ये दाखल केले. तेथे दाखल केल्यानंतर रुपाली चापले यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.


दरम्यानच्या काळात 2 अ‍ॅक्टीमेरा इंजेक्शनही देण्यात आली. डॉ. इंदोरिया यांनी प्रचंड मेहनत घेऊन रुपाली चापले यांची प्रकृती स्थिर केली. मात्र, रेमडिसिव्हीर या सहा इंजेक्शनची आवश्यकता होती. ही इंजेक्शन्स ठाण्यात मिळत नसल्याने हतबल झालेल्या राजू चापले यांचा डॉ. आव्हाड यांचाच फोन आला. अन् त्यांनी चापले यांना तत्काळ ही इंजेक्शन उपलब्ध करुन दिली. त्यामुळे केवळ 30 टक्के जगण्याची शक्यता असलेल्या रुपाली चापले यांचा जीव वाचला, असे रुपाली चापले यांचे पती राजू चापले यांनी सांगितले.


दरम्यान, शनिवारी सायंकाळी रुपाली चापले यांचा डिस्चार्ज करण्यात आला. काल सायंकाळी त्या घरी परतल्यानंतर त्या रहात असलेल्या चंदनवाडी भागामध्ये शेकडो नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत केले. डॉ. जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, डॉ. सुशील इंदोरिया आणि डॉ. संतोष कदम यांच्यामुळेच आपली पत्नी आज हे जग पहात आहे. जर, डॉ. आव्हाड यांनी वेळेवर इंजेक्शन दिली नसती तर अघटीत घडले असते, असे राजू चापले यांनी सांगितले.