ठाणे
ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक धोकादायक इमारती आहेत. दरवर्षी त्यांची यादी पालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात येते. मात्र केवळ यादी प्रसिद्ध करण्यापलिकडे पालिका कोणत्याही ठोस उपाययोजना करीत नाही. त्यामुळे ठाण्यात धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला असून लाखो रहिवासी जीव मुठीत घेऊन रहात आहेत. ऐन पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडून जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी आयुक्तांनी तातडीची बाब म्हणून निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
इमारत धोकादायक आहे किंवा नाही याचा निर्णय घेणा-या समितीची नोव्हेंबर २०१९ पासून बैठकच झालेली नाही. तसंच शहरातील ब-याच ठिकाणी नऊ मिटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते असल्याने पुनर्विकास अडू नये यासाठी विकास योजना रस्ता म्हणून समाविष्ट करण्याबाबत ठराव शासनाकडे पाठवला आहे. आयुक्तांनी याबाबत पाठपुरावा करावा आणि धोकादायक इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे. इमारत धोकादायक घोषित करणा-या समितीची गेल्या नऊ महिन्यात बैठक न झाल्याने घोषणा करण्यात दिरंगाई होत आहे. यामुळे धोकादायक इमारतींना प्रोत्साहनपर चटईक्षेत्र मिळू शकत नाही आणि पर्यायाने पुनर्विकास रखडतो. त्यामुळे रहिवाशांना नाईलाजाने तिथेच रहावे लागते. त्यामुळे याप्रकरणी आयुक्तांनी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.