सिग्नल शाळेचेही दहावीत यश
ठाणे
समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने तीन हात नाका पुलाखाली राहत असलेल्या तसंच दुष्काळी भागातील स्थलांतरीतांच्या मुलांसाठी सिग्नल शाळा हा अभिनव उपक्रम पाच वर्षांपुर्वी सुरू झाला. दोन वर्षांपुर्वी या शाळेतील दोन विदयार्थी दहावी उत्तीर्ण झाले. आज दहावीचा निकाल जाहीर झाला त्यात सिग्नल शाळेचा दशरथ जालिंदर पवार हा विदयार्थी ६६ टक्के गुण मिळवुन दहावीची परिक्षा उत्तिर्ण झाला. दशरथचे आई आणि वडील हे अनेक वर्षांपासुन सिग्नलवर गजरा विकण्याचा व्यवसाय करतात.
सिग्नल शाळा सुरू झाल्यानंतर दशरथ शाळेत दाखल झाला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शाळा झाल्यानंतर आईवडीलांना गजरे विकण्यास मदत करणे आदी कामे करून उशीरा रात्री पर्यंत अभ्यास करून दशरथने दहावीत ६६ टक्के मिळवले. यापुढे त्याला तंत्रशिक्षण घेण्याची इच्छा असुन त्यादृष्टीने समर्थ भारत व्यासपीठ त्याच्या भविष्यातील उच्चशिक्षणासाठी सहाय्य करणार आहे. सिग्नल शाळेच्या प्रकल्प प्रमुख आरती परब, शिक्षिका प्रियांका पाटील, संगिता एलल्ला, सुप्रिया कर्णीक, पौर्णीमा करंदीकर, सुमन शेवाळे, अवचट मॅडम यांच्या सहकार्याने दशरथ हे शैक्षणिक यश प्राप्त करू शकला आहे.