*नगरपरिषद, नपा व ग्रामीण क्षेत्रातील कंटेनमेंट झोन मध्ये ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन*
ठाणे
ठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोन अस्तित्वात असलेल्या ठिकाणी दि. १ जुलै रोजी लागू केलेल्या प्रतिबंधांना दि.31जुलै रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत मुदतवाढ घोषित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील या क्षेत्रात ३१ जुलैपर्यत लॉकडाउन असणार आहे. कंटेनमेंट झोन मध्ये कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव व रुग्ण संख्या वाढत असल्याने पूर्वीचे प्रतिबंध अस्तित्वात असलेल्या क्षेत्रापुरते पूर्ववत लागू ठेवणेत आले आहेत. शहापूर व मुरबाड नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तसेच अंबरनाथ व कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात मुख्याधिकारी यांनी कोरोनाग्रस्त व्यक्तींची संख्या विचारात घेऊन कंटेनमेंटझोन घोषित केलेले आहेत. त्या क्षेत्रामध्ये आता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. ज्या क्षेत्रात नव्याने कंटेनमेंट झोन अस्तित्वात येतील तेथे देखील हे प्रतिबंधात्मक आदेश दि.31 जुलै रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील.
कंटेनमेंट झोन च्या बाहेरील क्षेत्रासाठी राज्य शासनाचे मिशन बिगीन अगेन आदेशानुसार सवलती लागू राहतील. त्यानुसार मॉल्स व त्यासारखी मार्केट कॉम्प्लेक्सेस् वगळता सर्व प्रकारची दुकाने P1 - P2 तत्वावर सम/विषम तारखांना सकाळी 09.00 ते सायंकाळी 07.00 वा.पर्यंत सूरु राहतील. संबंधित नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामपंचायत त्याची अंमलबजावणी करणार आहेत. महानगरपालिकांच्या हद्दींमध्ये संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी घोषित केलेले लॉकडाऊनचे आदेश लागू राहतील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम व भारतीय दंड संहिता नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.