जिल्ह्यातील धरणामधून पाणीसाठा कमीच
ठाणे :
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पाऊसाचे प्रमाण वाढलेले दिसत असले तरीतरी धरण क्षेत्राकडे मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबई शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठय़ात फारशी वाढ झालेली नसल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या मध्यावरही धरणे ५० टक्क्यांहून अधिक रिकामीच आहेत.ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर आणि मुरबाड या धरणक्षेत्रात जून महिन्याच्या सुरुवातीपासून एक हजार मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, बारवी, तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा या धरणांच्या पाणीपातळीत फारशी वाढ झालेली नसून ही सर्व धरणे ५० टक्क्यांहून अधिक रिकामीच असल्याचे पाहायला मिळत आहे. भातसा धरणक्षेत्रात १ जूनपासून आतापर्यंत केवळ ९१० मिमी पाऊस झाला आहे. या धरणात सध्या ४३७.७७ दलघमी पाणीसाठा आहे, तर मोडकसागर धरणक्षेत्रात १ जूनपासून ६४९ मिमी इतक्या कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. या धरणामध्ये केवळ ४९.०४ दलघमी पाणी आहे. अशीच परिस्थिती तानसा धरणाची असून या धरणात १ जूनपासून केवळ ५७३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणक्षेत्रात केवळ ३३.३७ दलघमी कमी पाणीसाठा आहे.