२० वर्षे जुन्या इमारतीला तडे, पालिकेने केली नागरिकांची इतरत्र सोय
ठाणे
शहरातील एका 4 मजली साई आनंद इमारत 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. या इमारतीच्या भिंती आणि पिलर्सला तडे गेल्याने ती धोकादायक झाली होती. यामुळे बाजूच्या चाळीलाही धोका निर्माण झाला होता. यानंतर याठिकाणी पालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने पाहाणी केली. ठाण्यात आतापर्यंत पावसात अनेक इमारती पडून शेकडो लोकांचा बळी गेला आहे. तरीही नागरिक पर्याय नसल्याने आपला जीव मुठीत घेऊन अशा धोकादायक इमारतीत राहत आहेत. पावसाळा आणि जोरदार पाऊस आला की धोकादायक इमारतीचा विषय पुन्हा ऐरणीवर येत असतो. पालिका प्रशासन दरवर्षी अनेक इमारती रिकाम्या करते तर काही इमारती पाडण्याचेही काम करत असते. यावर्षीही पालिका प्रशासन अशा धोकादायक इमारती पाडण्याचे काम करणार आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. मुंबईतही गुरुवारी इमारत दुर्घटना घडली. मुंबईत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदाचीचा उपाय म्हणून ही इमारत आणि शेजारी असलेली चाळ रिकामी केली. तसेच यातील नागरिकांना बाजूच्या पालिकेच्या शाळेत राहण्याची व्यवस्था केली.