राजगृहावर हल्ला करणार्‍या खर्‍या गुन्हेगारांना जेरबंद करा- नानासाहेब इंदिसे 

राजगृहावर हल्ला करणार्‍या खर्‍या गुन्हेगारांना जेरबंद करा- नानासाहेब इंदिसे 


 ठाणे


राजगृहावरील हल्ला हा तमाम आंबेडकरी अनुयायांच्या अस्मितेवरील हल्ला आहे. आंबेडकरी चळवळीने अनेक चढउतार पाहिले आहेत. पण, बाबासाहेबांनी उभारलेल्या वास्तूवर हल्ला करण्याची हिमंत कोणीही दाखविली नव्हती.  आताच ही हिमंत कशी झाली? असा सवाल करुन या हल्ल्यातील खर्‍या गुन्हेगारांना अन् त्यामागील सुत्रधारांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी केली आहे.
 दि. 7 जुलै 2020 रोजी सायंकाळी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ या ठिकाणी काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्यात राजगृहातील अनेक वस्तूंची तोडफोड केली. या हल्ल्याचा रिपाइं एकतावादीने तीव्र शब्दात निषेध केला आहे.
  हा हल्ला म्हणजे आंबेडकरी अस्मितेवर झालेला आहे. राजगृह ही केवळ एक वास्तू नसून तमाम आंबेडकरी समाजाचा मानबिंदू आहे. या वास्तूमधूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली आहे. सुमारे 50 हजार पेक्षा अधिक पुस्तकांचा साठा असलेल्या या वास्तूवर झालेला हल्ला आमच्या अस्मितेवर झालेला हल्ला असल्याने तो आम्ही सहन करणार नाही. या हल्ल्यामागे असलेले सूत्रधार कोण आहेत अन् हल्लेखोरांनी कोणाच्या सांगण्यावरुन हा हल्ला केला आहे, याचा शोध गृहखात्याने तत्काळ घ्यावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजगृहावरील हल्लेखोरांची गय केली जाणार नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचे आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत. मात्र, त्यांनी तत्काळ कार्यवाही करुन  गुन्हेगारांना गजाआड टाकावे, अशी मागणी नानासाहेब इंदिसे यांनी केली आहे.