ठाणे जि.प.चे अध्यक्ष - उपाध्यक्ष बिनविरोध

ठाणे जि.प.चे अध्यक्ष - उपाध्यक्ष बिनविरोध;


शिवसेना - राष्ट्रवादीच्या महा आघाडीचा विजय


ठाणे :


पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या समवेत आज सकाळी बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडी गठीत करण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या आजच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाआघाडी गठीत केली. नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडुन आल्या आहेत तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.


 या निवडणुकीत भाजपाने उमेदवार दिला नाही. एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तथा सभा सचिव छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.


ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणूकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा पदावधी १५ जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले. ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.