खासगी हॉस्पिटलमध्ये शासकीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची माहिती द्या- आमदार प्रताप सरनाईक
ठाणे
येत्या ३ ऑगस्ट २०२० पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील जनतेच्या विविध मुद्याबरोबर सगळ्यात महत्वाच्या अशा कोरोनाच्या मुद्यावरही चर्चा होणार आहे. कोरोनाच्या संकटाशी सामना करावा यासाठी कोणत्या उपाययोजना ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी केल्या तसेच सरकारच्या योजनांची आपल्या हद्दीत कशी अंमलबाजवणी केली गेली याचा आढावाही घेतला जाणार आहे. आपल्या मनपा हद्दीत एकूण किती खासगी हॉस्पिटल आहेत ? त्यातील किती खासगी हॉस्पिटल पालिकेने कोविड हॉस्पिटल म्हणजेच कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी घोषित केली आहेत ? त्याच बरोबर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील किती हॉस्पिटल मध्ये आजवर किती कोरोना रुग्णांवर शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार झाले आहेत म्हणजेच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील विविध हॉस्पिटल मध्ये किती अल्प उत्पन्न गटातील कोरोना रुग्णांना मोफत उपचार आजवर देण्यात आले ? याची माहिती जनतेला कळली पाहिजे. असे मत प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केेल.
अनेक कोविड हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असून सुद्धा गरीब कोरोना रुग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेण्यात आले नाही. अशाही काही तक्रारी असून त्याबाबत आपण काय कारवाई केली ? कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राज्यात करीत आहे. या शासकीय योजना व उपाययोजनांची माहिती शहरात नागरिकांपर्यंत, विशेषतः रुग्ण व त्यांचे नातेवाईक, गरीब - गरजूपर्यंत पोहोचावी यासाठी पालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे.