आमदार प्रताप सरनाईक यांनी वाढीव वीज बिला संदर्भात विधिमंडळाच्या
सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडली.
ठाणे
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग-धंदे ठप्प झाल्यामुळे आणि लोकांना या काळात रोजगार नसल्याने महिन्याला घरी येणारी आर्थिक आवक बंद झाली आहे. गेल्या ४-५ महिन्यात सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. घरच्या प्राथमिक गरजा पूर्ण करताना लोकांची दमछाक होत आहे. सामान्य माणूस कसाबसा संसाराचा गाडा या कठीण परिस्थितीत पुढे ढकलायचा प्रयत्न करत असतांनाच, वीज कंपन्यांनी मात्र त्याला बिलाच्या माध्यमातुन जबरदस्त शॉक दिला आहे. वीज ग्राहकांना अदानी, टाटा, महावितरण या कंपन्यांकडून वीज बिले प्रचंड प्रमाणात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व असंतोष आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघात ठाणे, मीरा भाईंदर भागातही वाढीव वीज बिले आली आहेत.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना कोणतेही उत्पन्न नसताना वीज बिळांमुळे लोकांना मनस्ताप झाला आहे. अवा-च्या-सवा वीज बिले आल्याची अशी असंख्य उदाहरणं आहेत. “लॉकडाऊनच्या काळात या वीज कंपन्यांचा कुठलाही प्रतिनिधी मीटरचे रिडींग घ्यायला आला नाही, मग कुठल्या आधारावर ही अफाट बिले पाठवून वीज कंपन्यांनी लुट सुरु केलीय ?” असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत.
या वीज कंपन्यांच्या कार्यालयात वीज ग्राहकांना उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. लॉक डाऊनच्या काळात सर्वच घटकातील वीज ग्राहकांना जादा बिले आली आहेत. वीज वितरण कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा बिल आल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
वीज बिलाबाबतच्या तक्रारींचे शंभर टक्के निरसन करावे, कोणाही ग्राहकाला चुकीचे बिल भरायला लागू नये याची दक्षता वीज वितरण कंपन्यांनी घ्यावी; तक्रारींबाबत जलद प्रतिसाद पद्धतीने कार्यवाहीची यंत्रणा निर्माण करावी अशा सूचना ऊर्जा विभागाने केलेल्या असल्या तरी वीज कंपन्या ग्राहकांचे म्हणणे ऐकून न घेता बिल भरण्याची सक्ती करीत आहेत.
जनतेला आलेली प्रचंड विजबिले भरणे शक्य होत नाहीये. त्यामुळे लॉकडाऊन काळातील वीज ग्राहकांच्या वीज बिलाबाबत जास्तीत जास्त सवलत देण्यात यावी, ऊर्जा विभागाने याबाबत कार्यवाही करावी अशी वीज ग्राहकांच्या वतीने माझी मागणी आहे. खरे तर कोरोनाचे हे संकट पुढचे आणखी काही महिने राहील असे दिसते. त्यामुळे मार्च ते जून या महिन्याच्या वीज बिलाबाबत चौकशी करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा. यापुढे वीज ग्राहकांना योग्य बिले दिली जातील याची व्यवस्था करावी, अश्या प्रकारची लक्षवेधी सुचना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात मांडली.