स्वत: रस्त्यावर उतरलात तर पालकमंत्र्यांचे काम दिसेल!
घरात बसून टीका करणाऱ्यांना महापौर नरेश म्हस्के यांचा सणसणीत टोला
ठाणे,
पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे म्हणणारे स्वत: करोनाचा उद्भव झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घरात दडी मारून बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर प्रसंगी पीपीई किट घालून कोव्हिड रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी करत असल्याचे त्यांना माहिती नाही. जे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर अध्यक्ष म्हणवणाऱ्या व्यक्तीच्या गावीही नसावे, हे दुर्दैवी आहे, अशी घणाघाती टीका ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी येथे केली.
प्रशासन पालकमंत्र्यांची फसवणूक करत असून पालकमंत्र्यांनी आता रस्त्यावर उतरावे, अशा आशयाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे. परांजपे यांच्या या विधानाचा महापौर म्हस्के यांनी खरपूस समाचार घेतला. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून काम करत आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार आढावा बैठका घेऊन प्रशासनाला आवश्यक ते निर्देश देण्याबरोबरच प्रत्यक्ष क्वारंटाइन सेंटर्स आणि कोव्हिड रुग्णालयांना भेटी देऊन तेथील समस्या वेळोवेळी दूर केल्या. ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे पालकमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली अवघ्या २४ दिवसांत १०२४ बेड्सचे अद्ययावत कोव्हिड रुग्णालय देखील उभे राहिले. लॉकडाउनच्या काळात गरजूंना घरोघरी धान्यवाटप करण्यापासून मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची विनामूल्य व्यवस्था करण्यापर्यंत पालकमंत्री श्री. शिंदे यांनी प्रत्येक बाबतीत पुढाकार घेऊन, रस्त्यावर उतरूनच काम केले आहे.
परंतु, करोनाचा उद्भव झालेल्या दिवसापासून घरात दडी मारून बसलेल्यांना बाहेर काय चाललंय, याची कशी कल्पना असणार, असा टोलाही महापौर म्हस्के यांनी लगावला. त्यांच्या पक्षाचे ८० वर्षांचे प्रमुख प्रसंगी स्वत: रस्त्यावर उतरताना दिसतात, करोनाची बाधा झालेले महाराष्ट्रातले अनेक मंत्री व नेते उपचार घेऊन पुन्हा लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले; पण तरुण नेतृत्व म्हणवणाऱ्या ठाण्यातल्या नेत्यांचे नखही ठाणेकरांना गेल्या चार महिन्यांच्या काळात दिसलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.