कामात हलगर्जीपणा केला तर कठोर कारवाई
नवी मुंबई
नवी मुंबई महापालिका आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शहरात वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करून कामाला सुरुवात केली आहे. माजी आयुक्तांच्या काळात चाचणीचे जादा दराने कृष्ण लॅबला दिलेले काम बांगर यांनी तत्काळ थांबवले आहे. मंजुरी मिळवूनही अँटीजेन चाचणी सुरू करण्यात आली नसल्याने, या सर्व बाबींना मुख्य आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांना जबाबदार धरुन त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. नोटीसीत आपत्कालीन कायद्यातील कलम १८८ नुसार कारवाई करण्याचा इशारा दिला. कोरोना संसर्ग राखण्यासाठी नेमणूक करण्यात आलेले अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या कामात हलगर्जीपणा केला तर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
बांगर यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याआधी आयुक्त असलेले अण्णासाहेब मिसाळ कोविडच्या नियंत्रणाची जबाबदारी नव्याने उपायुक्त म्हणून पालिकेत रुजू झालेले डॉ. राहूल गेथे यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती तर सोनवणे यांच्याकडे नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी असलेल्या आरोग्य विभागाची जबाबदारी तत्कालीन आयुक्तांनी दिली होती. डॉ. गेथे यांच्या नियुक्तीवरून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. नवी मुंबई शहरातील वाढत्या कोरोना संसर्ग रोखण्याची प्रमुख जबाबदारी असल्याने, आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरुवातीपासून कठोर पावले उचलली आहेत.