ठाणे शहरात निर्जंतुकीकरणासाठी व्यापक धूर फवारणी
ठाणे
कोरोना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात निर्जंतुकीकरणासाठी व्यापक धूर फवारणी आणि स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. मोठया प्रमाणत मनुष्यबळ आणि मशीनरीच्या साहाय्याने संपूर्ण शहरात ही विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.
राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही मोहिम हाती घेण्यात आली असून आधुनिक यंत्राच्या साहाय्याने धुर फवारणी त्याचप्रमाणे सोडियम हायपोक्लोराईटच्या माध्यमातून संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने फवारणी करण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत आज महापालिका क्षेत्रातील कोपरी, गांधीनगर, परबवाडी, मनोरोग रुग्णालय, रघुनाथनगर, जय भवानीनगर, किसननगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर परिसरात सोडीयम हायपोक्लोराईट व धुर फवारणी करण्यात आली. या पुढेही ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
शहरात निर्जंतुकीरणाची व्यापकता वाढविण्यासाठी अग्निशमन दलाचे 8 ट्रॅक्टर्स, 8 टँकर्स, 8 बोलेरो युटीलीटी जीप, 8 बॅटरीवर चालणारी रिक्षा व 10 धुर फवारणी यंत्र तसेच 125 हॅन्डपंपाव्दारे औषध फवारणी करण्यात आली.