महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविकांना मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर चे वाटप.
महिला व बाल विकास विभाग घेत आहे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी
ठाणे
सध्या ग्रामीण भागामध्ये covid-19 चा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस आपली कामे चोख पार पाडत आहेत. हे काम करताना त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या १८५४ अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांना मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर यांच्या हस्ते भिवंडी तालुक्यातील राहनाळ येथे प्रातिनिधिक स्वरूपात सेविकांना कोरोना संरक्षित किट वाटप करण्यात आले.
एखाद्या गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्या ठिकाणी सर्वेक्षणाची मोहीम संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामार्फत हाती घेण्यात येते. हे सर्वेक्षण आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण करण्यात येते. कोरोनाचा वाढता फैलाव व टाळेबंदी यामुळे अनेकांच्या मनात भय चिंतेने घर केले आहे. एकूणच अशा परिस्थितीतील नकारात्मकता, चिंता , हुरहूर यांना तोंड देण्यासाठी नेमके काय करावे यासाठी तसेच सध्याच्या साथरोग परिस्थितीत आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल सर्वेक्षणातून जनजागृती करण्यात येते. हे सर्वेक्षण करत असताना अंगणवाडी सेविकांना स्वतःची काळजी घेणे आणि तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद ठाणे मार्फत अंगणवाडी सेविकांना मास्क, हॅन्ड ग्लोवस, सॅनिटायजर, फेसशील्ड चे वाटप करण्यात येत असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.
कोव्हिडं १९ संसर्गजन्य काळामध्ये अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडीतील नित्याची कामे करताना कोव्हिडं १९ सर्वेक्षण व जनजागृती कामे करत आहेत.ही कामे करताना त्यांची सुरक्षितता देखील महत्वाची आहे, राज्यातील ठाणे जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद असेल ज्यांनी असा प्रकारे उपक्रम हाती घेतला आहे. आम्ही सगळयांना अंगणवाडी सेविकांना, आणि इतर घटकांना मास्क, हॅन्ड ग्लोवस, सॅनिटायझर, फेसशील्ड भेट देत आहोत.