भैय्यासाहेब इंदिसे यांच्या पुढाकाराने डॉ.दिलीप पवार यांनी दिले ठाणे पालिकेला 10 व्हेंटीलेटर्स


भैय्यासाहेब इंदिसे यांच्या पुढाकाराने डॉ.दिलीप पवार यांनी दिले ठाणे पालिकेला 10 व्हेंटीलेटर्स

 

ठाणे

 

रिपाइं एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांच्या मध्यस्थीतून ठाणे महानगर पालिकेला कोरोना विशेषज्ज्ञ  सेव्हन हिल्स रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप पवार यांनी 10 व्हेंटीलेटर्स मोफत दिले आहेत. शुक्रवारी ठामपा आयुक्त विपीन शर्मा यांच्या दालनात हा कार्यक्रम संपन्न झाला.
सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. ज्या रुग्णांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आहे. अशा लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास व्हेंटीलेटर्सची आवश्यकता भासत असते. मात्र, सध्या व्हेंटीलेटर्सचा तुटवडा असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. ही बाब ध्यानात आल्यानंतर भैय्यासाहेब इंदिसे यांनी   डॉ. दिलीप पवार यांच्याशी संपर्क साधून ठाणे पालिकेला व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्याची विनंती केली. डॉ. पवार यांनीही मोठ्या मनाने ठाणे पालिकेला 10 व्हेंटीलेटर्स देण्याचे मान्य केले. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनात झालेल्या कार्यक्रमामध्ये हे व्हेंटीलेटर्स पालिकेकडे सुपूर्द करण्यात आले.
डॉ. पवार हे अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेऊन आले असून आपल्या देशाप्रती असलेल्या आदरभाव आणि प्रेमापोटी मुंबईतील सेव्हन हिल्स, शताब्दी रुग्णालय येथे आपली सेवा देत आहेत. सामाजिक भान राखून त्यांनी कांदिवली येथील दोन्ही कोविड सेंटर्सच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. उत्तर मुंबईत ते नियमितपणे पोलीस दलाचे स्क्रीनिंग आणि पोलिसांवर उपचार करीत आहेत. सायन रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, रेड क्रॉस पुणे यांना डॉ. पवार यांच्या माध्यमातून पीपीई किट तसेच रुग्णवाहिकाही देण्यात आलेल्या आहेत. वाफेच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्याचे संशोधन डॉ. पवार यांनीच केले आहे. त्यांच्या या कामामुळेच त्यांना इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडियन मेडीकल असोशिएशनने कोरोना वॉरियर पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. पवार यांनी विनंतीला मान देऊन ठाणे पालिकेेला 10 व्हेंटीलेटर्स दिल्याबद्दल आयुक्त डॉ. विपीन शर्मा, भैय्यासाहेब इंदिसे यांनी आभार मानले आहेत.