गणेशोत्सव साजरा करण्याकरिता राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना
ठाणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता काही मार्गदर्शक सूचना केल्या असून त्याचे पालन सर्व उत्सवमंडळांनी करावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
सार्वजनिक उत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.गणपतीची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी.
उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेने दिलास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंग ची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सॅनिटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
आगमन- विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये. कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.