वीजपुरवठा खंडित झाल्याने work from home वर परिणाम

वीजपुरवठा खंडित झाल्याने work from home वर परिणाम



ठाणे


ठाणे जिल्ह्य़ाला बुधवारी बसला. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मंगळवार रात्रीपासून सुरू असलेल्या पाऊस बुधवारीही कायम होता मात्र त्याच्यासोबत जोरदार वारेही होते.  यामुळे जिल्ह्य़ातील अनेक शहरांत वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. विजेच्या खांबांवर आणि तारांवर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.  तर कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून अनेक भागांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. वादळी वाऱ्यामुळे ठाणे, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूरसह ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले. विद्युत वाहिन्यांवर वृक्ष पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.त्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठय़ासह इंटरनेट सुविधा बंद पडल्याने घरून काम करणाऱ्यांचे काम ठप्प झाले.


ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांसह ग्रामीण भागात बुधवारी हे चित्र होते. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने शहरांमध्ये अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. ठाण्यातील तलावपाळी परिसरात असलेल्या टीजेएसबी बँकेच्या समोर एक वृक्ष उन्मळून पडला, तर शिवाईनगर परिसरात एका झाडाच्या फांद्या तुटून पडल्या.मुंब्रा शहरात मंगळवारी रात्रीपासूनच विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नौपाडा आणि मुंब्रा परिसरात मंगळवारी रात्री आग लागल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवितहानी टळली. तर खाडीकिनारी परिसरात नागरिकांनी फेरफटका मारण्यासाठी येऊ नये म्हणून या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डोंबिवलीतील पेंडसेनगर भागात वाऱ्यामुळे एक वृक्ष उन्मळून विद्युत वाहिन्यांवर पडल्याने या भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. टिटवाळ्यातील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वस्तुसंग्रहालाच्या इमारतीवरही वृक्ष पडला. सुदैवाने करोनाच्या संकटामुळे नागरिक घरात असल्याने मोठी दुर्घटना टळली. चक्रीवादळाच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी स्थानिक पोलिसांतर्फे ठिकठिकाणी उद्घोषणा केल्या जात होत्या. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रेही उडून गेले.