शाळा सुरू करण्याबाबत कोणतेही नियोजन नसल्याचे उघड
ठाणे :
जिल्ह्यातील पाच शाळा क्वारंटाइन कक्षासाठी वापरल्या जात आहेत. या पाच शाळांसह उर्वरित ९८५ शाळा सुरू करण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाकडे नसल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील २३ हजार शिक्षक सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. या शिक्षकांपैकी शाळेच्या जवळपास राहणाऱ्या एक हजार शिक्षकांचा समावेश आहे. तर, ११२ शिक्षक कोविड - १९ चे काम करत आहेत. त्यामुळे अनेक शाळा सुरू करण्याबाबत नियोजन नसल्याचे उघड झाले आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाने केलेल्या चाचपणीत ९९० शाळा या शहरात व कोरोनाच्या कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्या सुरू करण्याचे नियोजन नसल्याचे निदर्शनात आले आहे. याला शिक्षण विभागानेही दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात सध्या सव्वाआठ लाख विद्यार्थी पाचवी ते दहावीच्या वर्गात माध्यमिक शिक्षण घेत आहेत. जिल्ह्याच्या भिवंडी, शहापूर व मुरबाड या ग्रामीण भागामधील ३७ शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करता येणार आहेत. तर ४५ शाळा या अर्धवळ भरवता येतील आणि दिवसाआड एक वर्ग भरवता येईल,असे ८२ शाळांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, ४६२ शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग न भरवता कधी शाळा तर कधी आनलाइन पद्धतीने त्यात विद्यार्थ्यांना शिकवता येईल, असे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.