महापालिका आयुक्तांनी केली किसननगर, भटवाडी, शिवटेकडी विभागाची पाहणी

महापालिका आयुक्तांनी केली किसननगर, भटवाडी, शिवटेकडी विभागाची पाहणी


कळवा येथील क्वारंटाईन सेंटरलाही भेट - नगरसेवक, नागरिकांशी संवाद


 


ठाणे


महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज वागळे प्रभाग समितीतंर्गत किसननगर, भटवाडी, शिवटेकडी या परिसराची पाहणी करून त्यांनी तेथील स्थानिक नगरसेवक, नागरिक, डॅाक्टर्स यांच्याशी संवाद साधून तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी कळवा येथील सहकारनगरमधील क्वारंटाईन सेंटरलाही भेट दिली.


      कोरोना कोवीड 19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॅा. शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीची पाहणी सुरू केली असून त्यामध्ये कोवीडचा संसर्ग झालेले विभाग, सार्वजनिक शौचालये, फिव्हर क्लिनिक, सर्वेलन्स, प्रतिबंधित क्षेत्राची अंमलबजावणी आदी कामे कशा पद्धतीने चालत आहेत याची माहिती घेत आहेत. आज या भेटीत त्यांच्यासमवेत स्थायी समिती सभापती राम रेपाळे, योगेश जानकर, प्रकाश शिंदे, सौ. संध्या सुनील मोरे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव, माजी नगरसेवक संजय घाडीगावकर, सुनील मोरे आदी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्याच्यावेळी आमदार रविंद्र फाटक यांनीही महापालिका आयुक्तांशी संवाद साधला.


      महापालिका आयुक्तांनी आजच्या पाहणी दौऱ्यामध्ये भटवाडी, शिवटेकडी, किसननगर 2 येथील प्रतिबंधित क्षेत्राची तसेच किसननगर शाळा क्रमांक 23 येथील फिव्हर क्लिनिकची पाहणी केली. त्याचप्रमाणे तेथील सार्वजनिक शौचालयाचीही पाहणी करून रोज चार ते पाचवेळा शौचालयाची साफसफाई होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी डॅा. शर्मा यांनी भटवाडी नाल्याची पाहणी करून त्या नाल्यातील गाळ तातडीने बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.


      दरम्यान महापालिका आयुक्त यांनी कळवा प्रभाग समितीतंर्गत निर्माण करण्यात आलेल्या सहकारनगर येथील क्वारंटाईन सेंटरला भेट दिली. यावेळी या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत याची माहिती परिमंडळ उप आयुक्त मनीष जोशी आणि सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी दिली.