नियोजनाच्या अभावाचा फटका रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना
ठाणे
महामुंबई क्षेत्रातून दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. या कर्मचाऱ्यांच्या ने-आणीसाठी ‘बेस्ट’ तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडय़ा अपुऱ्या पडू लागल्याने राज्य सरकारच्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयाने उपनगरीय रेल्वेसेवा सुरू केली. त्यानुसार सोमवारपासून मध्य रेल्वेने २०० तर पश्चिम रेल्वेने १६२ लोकलफेऱ्या चालवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या लोकलगाडय़ांना ठरावीक स्थानकांतच थांबा देण्यात आला आहे. या लोकल केवळ जलद मार्गावरील स्थानकांतच थांबा घेतात. त्यामुळे उर्वरित स्थानकांच्या पट्टय़ात राहणाऱ्या किंवा त्या स्थानकांच्या परिसरातील कार्यालयांत काम करणाऱ्या प्रवाशांना जवळच्या ‘जलद’ थांब्यावर उतरून पुन्हा बस किंवा रिक्षा-टॅक्सीसाठी धावाधाव करावी लागत आहे. परिणामी लोकल सुरू होऊनही फरफट कायम आहे.
सध्या रेल्वे आपल्या क्षमतेच्या २५ टक्के सेवाच देत आहे. मात्र, या सेवेबाबतही रेल्वे, राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. या नियोजनाचा फटका रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना अधिक बसत आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाची रुग्णालये धिम्या मार्गावरील स्थानकांपासून जवळ आहेत. केईएम, टाटा यासारख्या रुग्णालयांपासून परळ स्थानक जवळ आहे. मात्र, परळ स्थानकात लोकल थांबत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांना दादर स्थानकात उतरून पुढे पायपीट करावी लागते. हार्बर मार्गावरही शिवडीऐवजी या प्रवाशांना वडाळय़ात उतरून टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो. पश्चिम रेल्वेवरील शताब्दी रुग्णालय (कांदिवली), बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर (जोगेश्वरी), मध्य रेल्वेवरील कस्तुरबा (चिंचपोकळी), शताब्दी (चेंबूर-गोवंडी) या रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांनाही कामाचे ठिकाण गाठण्यासाठी पूर्वीइतकीच धावपळ करावी लागत आहे.