अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात कॉंग्रेसचे धरणे आंदोलन
इंधनदरवाढ रद्द करा,जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
ठाणे
संपूर्ण देशात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे जनता हैराण झाली असतांना आता मागील काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगणाला भिडू लागले आहेत.त्यामुळे वाढत्या अन्यायकारक दरांबाबत शहर कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी केंद्र सरकाराच्या निशेर्धात धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत हे आंदोलन करुन ही दरवाढ रद्द करावी अशा आशयाचे निवेदन कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकाराने ही दरवाढ रद्द करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी केली.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकाराने घेतलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेर्पयत शहर मध्यवर्ती कॉंग्रेस कार्यालय परिसर,स्टेशन रोड ठाणे येथे हे आंदोलन घेण्यात आले.या प्रसंगी काँग्रेस नेते रविंद्र आंग्रे,जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे,काँग्रेसचै माजी गटनेते संजय घाडीगावकर,सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील ,आशिष दूबे,सन्नी थाॅमस आदि पदाधिकारी उपस्थित होते.
सध्यस्थितीत सुरु असलेल्या कोरोना संसर्गच्या पाश्र्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेलेले आहेत,अनेकांचे पगार कमी झालेले आहेत,घर चालविणे अनेकांना मुश्किल झाले आहे.बेरोजगारी वाढली आहे, व्यापारी वर्गाला आपला व्यवसाय कसा चालवायचा असा प्रश्न पडलेला आहे. परंतु मागील महिना भरात जवळ जवळ 9.50 रुपयांची वाढ पेट्रोल आणि डिझेलमध्ये केलेली आहे.या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तुंचेही दरवाढ होणार आहेत. त्यामुळे ही दरवाढ अन्यायकारक असून ती तत्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी केली.नागरीक आता आधीच एका संकटाचा सामना करीत असतांना दरवाढीचे हे दुसरे संकट कशासाठी असा सवाल सचिन शिंदे यांनी यावेळी उपस्थित करीत होते. या संदर्भात कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही दरवाढ रद्द करावी अशी मागणी देखील केली.