महापालिका आयुक्तांनी केली वागळे प्रभाग समितीमधील प्रतिबंधित क्षेत्र,
शौचालये आणि फिव्हर क्लिनिकची पाहणी : नगरसेवकांशी केली चर्चा
ठाणे
महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज वागळे प्रभाग समितीमधील प्रतिबंधित क्षेत्रे, सार्वजनिक शौचालय आणि फिव्हर क्लिनिक्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नगरसेवकांशीही चर्चा करून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सिंघल यांनी सुरूवातीस किसननगर शाळा क्रमांक २३ येथे सुरू असलेल्या फिव्हर क्लिनिकला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील डाॅक्टरांशी चर्चा करून रोज तापाचे रूग्ण सापडल्यास त्यांना क्वारंटाईन सेंटरला पाठविण्याच्या सूचना केल्या.
तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले स्थानिक नगरसेवक योगेश जानकर, प्रकाश शिंदे आणि सौ. संध्या मोरे यांच्याशीही चर्चा करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे आपापल्या प्रभागामधील लोकांना महानगरपालिकेच्या फिव्हर क्लिनिकमध्ये येवून तपासणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी आवाहन केले. त्यानंतर त्यांनी किसननगरमधील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून त्या ठिकाणी दिवसांतून पाचवेळा स्वच्छता व फवारणी होते का तसेच या ठिकाणी सॅनीटायझर उपलब्ध करून दिला आहे किंवा नाही याची माहिती घेतली.
आजच्या या पाहणी दौ-यामध्ये श्री. सिंघल यांनी शिवटेकडी येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच या झोनमध्ये कुठल्या ठिकाणी किती कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत, त्यांना कशामुळे संसर्ग झाला तसेच हे रूग्ण महापालिकेच्या फिव्हर ओपीडी, फिव्हर क्लिनिक किंवा घरोघरी करण्यात येणा-या ताप तपासणी सर्वेक्षणाच्या माध्यमातून आले आहेत का याचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त पथके तयार करून त्यांच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत प्रतिबंधित क्षेत्रामध्ये घरोघरी ताप तपासणी मोहिम पूर्ण करावी अशा सूचना दिल्या. यावेळी परिमंडळ २ चे उप आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त विजय कुमार जाधव आणि कार्यकारी अभियंता श्री. धुमाळ उपस्थित होते.