कॅान्टॅक्ट ट्रेसींग, कंटेनमेंट
योग्यरितीने करा - मुख्य सचिव अ
ठाणे
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज कोरोना कोव्हीड 19 च्या पार्श्वर्भूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या कामाचा आढावा घेवून कॅान्टॅक्ट ट्रेसींग वाढविणे, कंटेनमेंट झोनची व्याप्ती वाढवून त्याची कडक अंमलबजावणी करणे आणि रूग्णालय व्यवस्थापन आदी गोष्टींवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. यावेळी नगर विकास विभाग(2) चे प्रधान सचिव महेश पाठक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॅा. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार, महापालिका आयुक्त विजय सिंघल आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी महापालिकेच्यावतीने कोरोना कोव्हीडच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण कण्यात आले. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी प्रभाग समितीनिहाय कोरोना कोव्हीड 19 च्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. सहाय्यक आयुक्तांशी संवाद साधला. तसेच प्रत्येक कोरोना बाधित व्यक्तींच्या किमान 20 लोकांचे कॅान्टॅक्ट ट्रेसींग करण्याची आवश्यकता आहे तरच कोरोनाची साखळी तोडता येईल असे सांगितले. विशेष म्हणजे झोपडपट्टीमध्ये कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी क्वारंटाईन करू नका त्यांना महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्येच पाठवावे असे सांगितले. त्याच बरोबर कंटेनमेंट झोनची व्याप्ती वाढवून त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी श्री. अजोय मेहता यांनी रूग्णालय व्यवस्थापन महत्वाची बाब असून जास्तीत जास्त लोकांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये पाठवा जेणेकरून गरजू लोकांना ॲाक्सीजनचे बेडस उपलब्ध होतील असे सांगितले.
दरम्यान हे किचकट काम असून बारकाईने काम करण्याची गरज असल्याचे सांगून अजोय मेहता यांनी कॅान्टॅक्ट ट्रेसींग वाढवून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविणे याला प्राधान्य द्या असेही श्री. मेहता यांनी या बैठकीत सांगितले. यावेळी मुख्य सचिवांनी नवी मुंबई, मीरा भायंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी महापालिकेचा आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर मुख्य सचिवांनी ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एमएमआरडीए आणि एमसीएचआयच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या 1000 बेडस हॅास्पीटलची पाहणी करून त्याची प्रशंसा केली.