बंद असलेली रेल्वे-मेट्रो, बेस्टच्या अपुऱ्या फेऱ्या यामुळे नोकरदारांची तारांबळ
ठाणे
लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिलीकरण्यात आल्यानंतर सोमवारपासून खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्यास मुभा देण्यात आली. मात्र, सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय अत्यंत मर्यादित असल्याने उपनगरांतून शहरात येणाऱ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्टच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे सर्वसामान्यांना बसथांब्यावर तिष्ठत उभे राहावे लागले. ‘बेस्ट’ने प्रवास करणे शक्य न झाल्याने मुंबई उपनगरातील अनेकांना घरी परतावे लागले. जवळपास अडीच महिन्यांनंतर पहिल्यांदाच कामावर निघालेल्या नोकरदारांचे सोमवारी प्रचंड हाल झाले. बंद असलेली रेल्वे-मेट्रो, बेस्टच्या अपुऱ्या फेऱ्या, रिक्षा-टॅक्सींची रोडावलेली संख्या यामुळे कार्यालये गाठताना नोकरदारांची तारांबळ उडाली. दुसरीकडे, मोठय़ा प्रमाणात खासगी वाहने रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील मुंबईमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी ७५ दिवसांनी कामासाठी बाहेर पडले. या प्रवाशांसाठी वाहतूक सेवेसाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याचे सोमवारी दिसून आले.