चुकीचा रिपोर्ट दिल्याने गर्भवती महिलेला मनस्ताप
ठाणे :
कळवा रुग्णालयाने ११ जूनला एका महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला. त्यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड कक्षात ठेवले. मात्र, तिचे सीझर करणे आवश्यक असल्यामुळे तिला मुंबईतील नायर रुग्णालयात पाठवले. तेथे सिव्हिलने पाठवलेला रिपोर्ट या महिलेचा नसल्याचे उघड झाले. केवळ आडनावातील साधर्म्यामुळे चुकीचा रिपोर्ट पाठवल्याची कबुली सिव्हिल रुग्णालयाने दिली आहे. यापूर्वी चुकीचा रिपोर्ट देणा या एका खाजगी लॅबवर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे; मात्र आता पालिकेच्याच लॅबने चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित व्यक्तींवर कडक कारवाईची मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.
ही महिला कशेळीत राहणारी असून जिचा रिपोर्ट या महिलेला देण्यात आला होती, ती पॉझिटिव्ह महिला वाशी येथे राहणारी आहे. संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत काहीही दोष नसताना वणवण करावी लागल्यामुळे तिच्या डोळ्यांत पाणी आले. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटलच्या गोंधळामुळे एका नऊ महिन्यांच्या गर्भवतीला मनस्ताप सहन करावा लागला आहे. निगेटिव्ह असताना केवळ कळवा हॉस्पिटलच्या चुकीच्या रिपोर्टमुळे या महिलेला सिव्हिलच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला लागण झाल्याचा आरोप या महिलेच्या पतीने केला आहे. हे सर्व प्रकरण सावरण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे.