जेष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचा कोरोनाशी लढा अपयशी
ठाणे :
राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचा कोरोनाशी लढा देता देता अखेर मृत्यू झाला. मागील 14 दिवस ते मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. परंतु त्यांना मधुमेहाचा देखील त्रास होता, तसेच बीपीचाही त्रास त्यांना जाणवत होता. त्यामुळे पहिल्या दिवसापासून 14 दिवस ते वेंटीलेटरवर होते. डॉक्टरांचे देखील शर्तीचे प्रयत्न सुरु होते. परंतु त्यांचे हे प्रयत्न देखील असफल ठरले आणि केणी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन आणि एक नातु असा परिवार आहे.मुकुंद केणी हे कळव्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. सलग दुसऱ्यांदा त्यांनी नगरसेवक पद भुषविले होते.
देशभरात कोरोनाची लागण झाल्यानंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत होते. कळव्यात सुरवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत होती. त्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने अनेक गोर गरीब नागरीकांचे हाल सुरु होते. अशातच संपूर्ण केणी कुटुंब या नागरीकांच्या मदतीसाठी मैदानात उतरले होते. पहिल्या दिवसापासून अगदी आतापर्यंत त्यांच्याकडून प्रत्येकाला मदतीचा ओघ सुरुच होता. त्यातच एखाद्याची टेस्ट केली जात नसेल, एखाद्याला रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नसेल तर केणी हे स्वत: रुग्णालयात जात होते. अशातच कळवा रुग्णालयात एकाला दाखल करण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना ताप येऊ लागला, तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता. लागलीच त्यांनी कोरोनाची चाचणी केली. यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांना घोडबंदर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मागील 14 दिवस ते व्हेंटीलेटरवर होते, त्यात त्यांना मधुमेहाचा आणि बीपीचाही त्रास होता. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद देत नव्हते, मागील 14 दिवस त्यांचा कोरोनाशी लढा सुरु होता. अखेर मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.