संदर्भ रुग्णालयाला पुन्हा सार्वजनिक रुग्णालय करावे
नवी मुंबई :
नवी मुंबई शहरातील वाशी प्रथम संदर्भ रुग्णालय गेले तीन महिने संपूर्ण करोना रुग्णालय करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या रुग्णालयावर शहरातील सामान्यांची आजवर भिस्त होती. मात्र, करोना काळात हे रुग्णालय ‘कोविड’साठी उपलब्ध करून देण्यात आले. वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाची क्षमता ३०० खाटांची आहे. याशिवाय पालिकेने कोटय़वधी रुपये खर्चून नेरुळ, ऐरोली आणि बेलापूर येथे रुग्णालये उभारली आहेत. परंतु सध्या ती शोभेपुरतीच आहेत. याच वेळी वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात समर्पित ‘कोविड’ रुग्णालय तयार करण्यात आल्याने प्रथम संदर्भ रुग्णालयातील रुग्ण तेथे हलविण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी केल्याने पालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. पावसाळ्यात अन्य आजाराच्या रुग्णांची गैरसोय होणार असल्याच्या शक्यतेमुळे प्रथम संदर्भ रुग्णालयाला पुन्हा सार्वजनिक रुग्णालय करावे आणि वाशीतील करोना रुग्ण सिडको प्रदर्शनी केंद्र येथे हलवण्याची मागणी नाईक यांनी केली होती.