1000 बेड हॉस्पीटलच्या देणग्या एमसीएचआय, जितो ट्रस्टच्या तिजोरीत – महापालिका आयुक्तांचा अजब निर्णय
ठाणे महापालिकेचा १००० बेडचे रुग्णालय हा `ड्रीम प्रोजेक्ट’ मानला जातो. माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये रुग्णालय उभारले जात असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयाची जबाबदारी महापालिकेची असल्याचे मानले जात होते. प्रत्यक्षात सीईआर निधीतून रुग्णालय उभारले जात आहे. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी २२ मे रोजी आदेश काढून १००० बेडच्या रुग्णालयाची जबाबदारी एमसीएचआय आणि जितो एज्युकेशन अॅण्ड मेडिकल ट्रस्टकडे सोपविली आहे.बड्या बिल्डरांच्या प्रकल्पातून सामाजिक कामांसाठी कॉर्पोरेट पर्यावरणीय जबाबदारी (सीईआर) निधी जमा केला जातो. त्यातून सरकार वा महापालिकेला आरोग्यासह विविध कामे करता येतात.
त्यानुसार ठाणे महापालिकेने शहरातील बड्या बिल्डरांकडून निधी जमविण्यास सुरूवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी शहरातील बड्या बिल्डरांना पत्रे पाठविली आहेत. त्यात एमसीएचआय, ठाणे आणि जितो ट्रस्टच्या खात्यावर थेट निधी जमा करण्याची सुचना देऊन खात्यांचा सविस्तर तपशील दिला आहे.या प्रकाराला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे. सामाजिक कामांसाठी सीईआर निधी अस्तित्वात आला. त्यातून सरकारी यंत्रणेने स्वत: कामे करण्याची अपेक्षा आहे. ठाण्यातील बिल्डर लॉबीने शहराचे किती भले केले, हे सर्व सुजाण ठाणेकर जाणत आहेत. अशा परिस्थितीत बिल्डरांकडून निधी जमा करून, तो बिल्डरांच्या संघटनेलाच वापरण्यास देणे किती संयुक्तीक आहे, असा सवाल पवार यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. रुग्णालय चालविण्यासाठी ठाणे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन अकार्यक्षम आहे का. महापालिका संबंधित प्रकल्पावर नियंत्रण ठेवणार असल्याचे स्पष्ट केले जात असले, तरी ते प्रत्यक्षात होईल का, असा सवालही त्यांनी केला आहे.