लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि मुंब्य्रात रुग्णांची वाढणारी संख्या पालिकेसाठी डोकेदुखी

लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि मुंब्य्रात रुग्णांची वाढणारी संख्या पालिकेसाठी डोकेदुखी


ठाणे



 ठाण्यातील लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि मुंब्यात रुग्णांची वाढणारी संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. लोकमान्य आणि वागळे इस्टेट हा पटटा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे. तरीही या भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  येथील परिसर हा संपूर्णपणे झोपडपटटीचा असल्याने त्यावर उपाय योजना कशा करायच्या असा पेच पालिकेला सतावू लागला आहे.


 मागील १५ दिवसात या भागात रुग्णांची संख्या ही गुणाकाराने वाढतांना दिसत आहे. लोकमान्य नगर भागात तर रोज नवीन १० ते २० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही संख्या कमी कशी करायची कोणत्या उपाय योजना करायच्या असा पेच पालिकेला सतावू लागला आहे.  मृत्यु पावलेल्यांमध्येही याच पटटातील नागरीकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. हा भाग पूर्णपणे दाटीवाटीचा आणि गर्दीचा भाग आहे. घराला लागून घरे असून झोपडपटटीने हा भाग व्यापला गेला आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रार्दुभाव वेगाने होताना दिसत आहे. त्यात मागील काही दिवसापूर्वी लोकमान्य नगर आणि वागळे प्रभाग समितीमधील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही आता अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहेत. असे असतांनाही आता या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.


आजही नागरीक सर्व सेवा बंद असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरतांना दिसत आहेत. पालिका आणि पोलीसांकडून देखील नागरीकांना वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनही हतबल झाले आहे. दुसरीकडे मागील काही दिवस मुंब्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ही कमी वाटत होती. मात्र मागील चार ते पाच दिवसात पुन्हा येथील रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे.