सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांविरोधात  थेट फौजदारी गुन्हा 

सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांविरोधात  थेट फौजदारी गुन्हा 



कल्याण :


करोना संकटकाळात शहर स्वच्छतेला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्राधान्य दिले आहे. घनकचऱ्यातील तज्ज्ञ उपायुक्त रामदास कोकरे यांच्यावर कचरा निर्मूलनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कचऱ्याचे ओला-सुका वर्गीकरण आणि कोठेही कचरा फेकून न देणे ही रहिवाशांची सवय मोडायला हवी, असा निष्कर्ष उपायुक्त कोकरे यांनी काढला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणारे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, कचराकुंडी नसताना त्या ठिकाणी कचरा टाकणे, ओला-सुका कचरा वर्गीकरण न करणाऱ्यांविरोधात ही मोहीम उघडण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट आणि ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेने घेतला आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर, तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांना धुडकावणाऱ्यांना २०० ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २५ मेपासून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.