कोरोनावर मात केलेल्या रुग्णाला दाखविले पॉझिटीव्ह, ठामपाचा भोंगळ कारभार

कोरोना संदर्भात ठामपाचा भोंगळ कारभार उघडकीस
कोरोनावर मात केलेल्या रुग्णाला दाखविले पॉझिटीव्ह


ठाणे


 कोरोनाच्या बाबतीत ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये ताळमेळ नसल्याचे अनेकदा उघडकीस आलेले असतानाच आता आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. कोरोनावर मात करुन 12 मे रोजी घरी परतलेल्या रुग्णाला चक्क 23 मे रोजीच्या यादीमध्ये पॉझिटीव्ह दाखविण्याचा विचित्र प्रकार घडला आहे.
एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या हा रुग्ण 17 एप्रिल रोजी स्वॅब तपासणीमध्ये कोरोना संसर्गित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या रुग्णास कौशल्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे रुग्णसंख्या वाढू लागल्याने या रुग्णाने नंतर सफायर रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनावर पूर्ण मात केल्यानंतर या रुग्णाला 12 मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला. तसेच, होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पूर्णपणे कोरनामुक्त झालेला हा रुग्ण खोपट येथील आपल्या निवासस्थानी रहात आहे. असे असतानाच ठाणे पालिकेने शनिवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये 107 व्या क्रमांकावर सदर रुग्णाचे नाव त्याच्या राहत्या पत्त्यासह प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे, ही यादी काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या रुग्णाला अनेकांचे फोन आले. तसेच, हा रुग्ण रहात असलेल्या इमारतीमधील लोकही त्यांच्याकडे संशयाने पाहू लागले.  सदर रुग्णाने ठामपाच्या अधिकार्‍यांना फोन केल्यानंतरही त्यांच्याकडून त्यांना अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत. 
या प्रकरणात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, ठामपा आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचे सदर कोरोनामुक्त रुग्णाने सांगितले.