काळी फीत लावून कामगार विरोधी धोरणाचा निषेध दिन पाळण्यात येणार
ठाणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनचा गैरफायदा घेत केंद्र सरकारने व अनेक राज्यातील सरकारांनी कामाचे तास ८ वरून १२ करणे, कामगार कायद्यांना स्थगिती देणे, कामगार कायद्यात मालकधार्जिणे बदल करणे अशाप्रकारे कामगारांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे याविरोधात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डाॅ.जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सर्व केंद्रीय श्रमिक संघटनांच्या वतीने उद्या २२ मे, २०२० रोजी काळी फीत लावून कामगार विरोधी धोरणाचा निषेध दिन पाळण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले.
निषेध दिन पाळण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक दि.२० मे, २०२० रोजी झुम अपवर व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली असून महाराष्ट्र इंटकला संलग्न असलेल्या २८८ संघटना उद्या निषेध दिनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एस.टी., एम.एस.ई.बी., कोल, रेल्वे, पोर्ट, औद्योगिक क्षेत्रातील, सिमेंट, केमिकल, मिल, महानगरपालिका, माॅईल, बीएसएनएल, बीडी, बँक यासह विविध क्षेत्रातील कामगार सामाजिक सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) पाळून कायदेशीर मार्गाने कामावर असताना खिशाला काळी फीत लावून निषेध दिवस पाळण्यात येणार आहे.