१९० पैकी ९३ विक्रेत्यांनाच घरपोच मद्यविक्रीचे ओळखपत्र

१९० दुकानांपैकी ९३ विक्रेत्यांनाच घरपोच मद्यविक्रीचे ओळखपत्र



ठाणे :


ठाणे जिल्ह्य़ातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळून सोमवारपासून इतर भागांत घरपोच मद्यविक्री करण्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी परवानगी दिली आहे. यासाठी ओळखपत्र देताना दुकानदारांनी मद्य पोहोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन आहे. कर्मचाऱ्यांना (डिलिव्हरी बॉय) कोणताही आजार नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देऊ न शकल्याने उत्पादन शुल्क विभागाने  ठाणे जिल्ह्यतील १९० मद्यविक्री दुकानांपैकी ९३ विक्रेत्यांनाच घरपोच मद्यविक्रीचे ओळखपत्र दिले आहे. हे प्रमाण एकूण दुकानांच्या ५० टक्क्यांहून कमी आहे. त्यामुळे सोमवारी सुरू होणाऱ्या व्यवस्थेवरील ग्राहकांचा भार वाढू शकतो. वितरणासाठी दहापेक्षा अधिक कर्मचारी नेमू नयेत, एका वेळी २४ बाटल्यांपेक्षा अधिक बाटल्यांची वाहतूक करता येणार नाही असाही नियम आहे. दरम्यान, ७५ दुकानदारांना  कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करता आले नाही. याशिवाय दहा दुकाने प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. सात दुकानदारांचे कोणतेही अर्ज आले नाहीत. त्यामुळे ९३ दुकानदारांनाच घरपोच मद्यविक्रीचे ओळखपत्र देण्यात आले, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.