घोडबंदर परिसरातील निर्बंध आजपासून कमी

घोडबंदर परिसरातील निर्बंध आजपासून कमी



ठाणे


चार दिवसांपासून संपूर्ण टाळेबंदीला सामोरे गेलेल्या घोडबंदर परिसरातील निर्बंध मंगळवारपासून कमी करण्यात आले आहेत. औषधालये, दूध, किराणा तसेच भाजीपाल्याची दुकाने या निर्णयामुळे सुरू केली जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तू, दूध, भाजीपाला, फळे, बेकरी, चिकन आणि मटणाची घरपोच विक्री व्यवस्थाही पूर्ववत केली जाणार आहे. या भागात रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने १५ मे पासून या ठिकाणी संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय जाहीर केला होता. कापूरबावडीपासून ते गायमुखपर्यंतच्या परिसरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, सोमवारी तो निर्णय मागे घेण्यात आला. पुढील आठवडय़ात ईदचा सण येत आहे. कासारवडवली तसेच आसपासच्या परिसरात मुस्लीम समाजाची संख्या अधिक आहे. ईदचा सण घरी साजरा करता यावा यासाठी आवश्यक खरेदीचा पर्याय उपलब्ध व्हावा असाही विचार यामागे होता अशी माहिती  वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नौपाडा आणि पाचपाखाडी परिसरात संपूर्ण टाळेबंदीबाबत महापालिकेचे कोणतेही आदेश नसताना पोलिसांनी या भागांत तीन दिवसांपासून सक्तीची टाळेबंदी लागू केली आहे. या भागातील किरकोळ भाजी विक्रेते, जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने बंद करण्याचा सपाटाच पोलिसांनी लावला असून यामुळे येथील रहिवासी चक्रावून गेले आहेत. दरम्यान, खारकर आळी आणि जांभळीनाका परिसरातील घाऊक किराणा बाजारपेठेचा अपवादवगळता नौपाडा, पाचपाखाडीत संपूर्ण टाळेबंदीचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.


ठाणे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जाणारा नौपाडा परिसर अजूनही पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाही. याच भागातील खारकर आळीमध्ये एक करोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्याच परिसरात घाऊक किराणा बाजारपेठ आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने खारकर आळी, जांभळीनाका भागातील घाऊक किराणा बाजारपेठ येत्या २५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी जाहीर केला, तर भगवती शाळेच्या मैदानात तात्पुरत्या स्वरूपावर उभारण्यात आलेल्या भाजीमंडईत नागरिकांची गर्दी होत असल्याने ती मंडईदेखील २५ मेपर्यंत बंद ठेवण्यात आली. असे असले तरी नौपाडा, पाचपाखाडी भागातील किराणा, भाजी, दूध, औषध दुकाने यापूर्वी ठरलेल्या वेळेत नेहमीप्रमाणे सुरू राहातील, असे स्पष्टीकरण माळवी यांनी दिले.  दरम्यान, पालिकेचेआदेश नसताना ठाणे पोलिसांनी मात्र  तीन दिवसांपासून नौपाडा, कचराळी तलाव परिसर, पाचपाखाडी, हरि निवास चौकातील दुकानेही बंद करण्यात आली.


 

Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किट झाला आहे. मात्र, वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय
Image