तिन्ही झोनमध्ये दारूच्या दुकानांना परवानगी, दोन झोन मध्ये सलुनही उघडे राहणार





तिन्ही झोनमध्ये दारूच्या दुकानांना परवानगी, दोन झोन मध्ये सलुनही उघडे राहणार



नवी दिल्ली


गृह मंत्रालयाने शुक्रवारी टाळेबंदीची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, हरित व नारिंगी क्षेत्रांमधील अनेक निर्बंध उठवले होते. ४ मेपासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात हरित व नारिंगी क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली जाईल; तसेच हरित, नारिंगी व लाल व तिन्ही क्षेत्रांमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. ई-कॉमर्स कंपन्यांकरवी जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या विक्रीचीही मुभा दिली जाईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. या दोन क्षेत्रांमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या विक्रीवर काही निर्बंध असणार नाहीत, असे गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले. या भागांमध्ये केशकर्तनालये आणि सलूनही उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे तो म्हणाला.


लाल क्षेत्रांमध्ये (रेड झोन) ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तू विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र केशकर्तनालये व सलून या वस्तू नसून सेवा असल्याने त्यांना या क्षेत्रांमध्ये उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. नारंगी क्षेत्रांमध्ये एक चालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. परवानगी असलेल्या उपक्रमांसाठी व्यक्ती आणि वाहनांच्या आंतर- जिल्हा वाहतुकीला मुभा आहे. यासाठी चार चाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त २ प्रवाशांना प्रवास करता येईल. सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या निकषांमध्ये यासाठी परवानगी दिली गेली नव्हती. मात्र, नारंगी क्षेत्रांमध्ये बसगाडय़ांच्या आंतर-जिल्हा व जिल्ह्य़ांतर्गत वाहतुकीवरील बंदी कायम राहणार असल्याचे मंत्रालयाने सांगितले. लाल क्षेत्रांमध्ये मोलकरणींना कामाची परवानगी देण्याबाबत संबंधित सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी आरोग्यविषयक खबरदारी घ्यावी लागणार आहे.