जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिक बेडची व्यवस्था

जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिक बेडची व्यवस्था


ठाणे



जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात जिल्हा रुग्णालयात खाटांची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाने रुग्णालयात आणखी ८० खाटांची व्यवस्था चालविली आहे. या वाढीव खाटांसह ते २५० खाटांचे होण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांची केबिन असलेल्या इमारतीतील काही विभाग परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत हलवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची वाढत आहे.६ मेपर्यंत एक हजार ५१३ रुग्ण आढळले असून ४२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ३९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.मध्यंतरी, जिल्हा सामान्य रुग्णालयाची कोविड १९ चे विशेष रुग्णालय म्हणून नाव घोषित केले. तेव्हापासून म्हणजे जवळपास दीड महिना या रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


आतापर्यंत ३०१ जणांना उपचारार्थ दाखल केले असून यामध्ये २३४ जण हे पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहेत. सध्या पुढे येत असलेले रुग्ण लक्षात घेऊन या व्यवस्थेची तयारी केली आहे. येणाऱ्या रुग्णांना येथे दाखल करून तातडीने उपचार दिले जाणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय जिल्हा शल्यचिकित्सक,  डॉ. कैलाश पवार यांनी दिली.