वाशी खाडी पुलावरील पथदिवे आठ महिन्यांनंतर सुरू

वाशी खाडी पुलावरील पथदिवे आठ महिन्यांनंतर सुरू



नवी मुंबई


मागील वर्षी ९ नोव्हेंबरपासून नवी मुंबई - वाशी खाडी पुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले. यामुळे दोन महिने या पुलावरील वाहतूक संथगतीने सुरू होती. डिसेंबर अखेर काम संपल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने डांबरीकरणाबरोबरच पुलावर दोनशे नवे पथदिवे लावले होते. तसेच पुलाच्या प्रारंभी व शेवटी हायमास्टही लावले होते. जनरेटरचीही व्यवस्था केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणच्या परवानगीच्या कचाटय़ात हे दिवे सुरू झाले नव्हते. त्यामुळे पूल अंधारात होता. या ठिकाणी अनेक अपघातही झाले आहेत. अखेर या पुलावर पथदिवे सुरू करण्यात आल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.


 मार्चमध्ये येथील वीज उपकेंद्र महावितरणला हस्तांतरित करण्यात येणार होते. दरम्यान, करोनामुळे टाळेबंदी जाीहर करण्यात आली. या अडचणींमुळे हा पूल अंधारात होता. अखेरीस शनिवारपासून पथदिवे सुरू झाले आहेत. विद्युत विभागामार्फत वाशी खाडीपुलावरील पथदिव्यांबाबतचे काम सुरू करण्यात आले होते. तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे कामाला विलंब झाला. त्यातच टाळेबंदीमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता पुलावरील पथदिवे सुरू करण्यात आले असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस.एस.जगताप यांनी केली आहे.