टाळेबंदीच्या काळात भाजीपाला नियमन मुक्तीच्या अध्यादेशाचा मोठा फायदा

 टाळेबंदीच्या काळात भाजीपाला नियमन मुक्तीच्या अध्यादेशाचा मोठा फायदा



ठाणे


राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीतून भाजीपाला नियमन मुक्त झाल्याने भाजीपाल्याच्या मालाची बाजार समितीत नोंदणी करणे आवश्यक राहिलेले नाही. शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला मुंबई आणि उपनगरात थेट विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. टाळेबंदीच्या काळात भाजीपाला नियमन मुक्तीच्या अध्यादेशाचा मोठा फायदा दिसून येत असून नाशिक तसेच पुण्याहून थेट मुंबई आणि ठाण्यात दररोज २०० ते ४५० भाजीपाल्याच्या गाडय़ांची आवक विविध मार्गाने सुरू आहे. मुंबई, ठाण्यातील अनेक मोठय़ा गृहनिर्माण संस्थांमध्ये तसेच वसाहतींमध्ये थेट भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध होत आहे, अशी माहिती  ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन ताजा भाजीपाला थेट गृहसंकुलांपर्यंत पोहोचवावा, असे माने यांनी सांगितले.


बाजार समिती प्रशासनाच्या प्रयत्नांनतरही वाशी येथील कृषी मालाच्या बाजारपेठांमध्ये साथसोवळ्याच्या नियमांची पायमल्ली केली जात असून या बाजारांशी संबंधित घटकांना मोठय़ा प्रमाणावर करोनाची लागण होत आहे. त्यामुळे या बाजारपेठा किमान १४ दिवसांसाठी बंद केल्या जाव्यात, असा नवी मुंबई महापालिकेचा आग्रह आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ावर प्रतिकूल परिणाम होईल या भीतीने बाजारपेठा अंशत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात भाजीपाला, डाळी, फळे, कांदा-बटाटा थेट मुंबईत विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा मार्ग खुला असताना या बाजारपेठा सुरू ठेवाव्यात, असा आग्रह कशासाठी असा सवाल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित करत आहेत.


शेतातला माल थेट ग्राहकाच्या दारात पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना करोना काळात निर्माण झालेल्या संकटामुळे अखेर यश मिळू लागले आहे. पुणे आणि नाशिक या बागायत पट्टय़ातून दररोज ३५० ते ४०० गाडी भाजीपाला थेट मुंबईत रवाना होत असून महानगर क्षेत्रातील अनेक नागरी वसाहतींमध्ये भाज्यांचा पुरवठा होऊ लागला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टाळेबंदीच्या काळात आतापर्यंत सुमारे दहा हजारांहून अधिक भाजीपाल्याची वाहने थेट मुंबईत विक्रीसाठी गेली आहे.