टीएमटीच्या बसेस अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतरित

टीएमटीच्या बसेस अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतरित



ठाणे


पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने ठाणे  महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी टीएमटीच्या बसेस अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतरित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रविवारी पाच बसचे काम पूर्ण झाले. विशेष म्हणजे या बसेसमध्ये तीन पाळ्यांमध्ये ब्रदर्स आणि अटेण्डंटची नियुक्ती करण्यात आली आहे.


महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन  हा निर्णय घेण्यात आला आहे. एका बसमध्ये दोन बेड बसविण्यात आले असून, ड्रायव्हरच्या केबिनपासून अॅम्ब्युलन्सचा भाग पार्टीशनच्या साहाय्याने पूर्णत: स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. या बस अॅम्ब्युलन्स तीन पाळ्यांमध्ये चालविण्यात येणार असून, प्रत्येक बसमध्ये प्रत्येक पाळीमध्ये एक ब्रदर आणि एक अटेण्डंट नियुक्त करण्यात आले आहेत. पहिल्या पाच बस अॅम्ब्युलन्स रविवारी सेवेत रूजू झाल्या. उर्वरित पाच बसेस सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने चालणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे याचे नियंत्रण ठेवण्यात आले असून या सेवेसाठी ०२२-२५३९९८२८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.