कोरोना संकटाचा फटका लघु आणि नव उद्योजकांना

कोरोना संकटाचा फटका लघु आणि नव उद्योजकांना



बदलापूर


करोना विषाणूच्या संकटाचा मोठ्या उद्योजकांसह लघू उद्योजक आणि नवउद्योजकांना मोठा फटका बसला आहे. अतिशय कष्टाने आणि हिमतीने लाखोंची गुंतवणूक करून सुरू केलेला व्यवसाय संकटात सापडल्याने नवउद्योजक चिंतातूर झाले आहेत.  दुकानाचे भाडे, गुंतवलेली रक्कम आणि परताव्याचा वाढलेला कालावधी, त्यात कामगारांना द्यायचे वेतन अशा कोंडीत हे उद्योजक सापडले आहेत. कर्ज काढून, बचतीचे पैसे गुंतवून सुरू केलेला उद्योग बंद पडल्याने ज्या वास्तूंमध्ये उद्योगाला सुरूवात केली होती त्या वास्तूचे मासिक भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.


वर्षभरापूर्वी उल्हासनगरच्या बाजारात स्वत:च्या बचतीतून किचन आणि इंटेरियरचे दुकान सुरू करणाऱ्या निशांत शिरसाठ यांनीही भविष्याबाबत चिंताग्रस्त असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  बँकांचे कर्ज,  दुकानाचे भाडे आणि कामगारांचा पगार किती काळ द्यायचा असाही सवाल त्यांनी व्यक्त केला आहे.  वर्षभरापूर्वी कचन आणि इंटेरियरचे दुकान सुरू करणाऱ्या निशांत शिरसाठ यांनीही भविष्याबाबत चिंताग्रस्त असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.


तर काही वर्षांपूर्वी स्वत:ची चांगल्या पगाराची नोकरी सोडून केक निर्मितीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या बदलापूरच्या जयेश बेंडखले यांच्यापुढेही पुढच्या काळात उभारी कशी घ्यायची याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आमच्या उभारणीसाठी सरकारने बिनव्याजी कर्ज, वीज बिल आणि करात दिलासा यांसारखा दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, हे सर्व शासनाच्या पुढील धोरणावर ठरणार आहे.