कळव्यात ५०० बेडच्या रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरु

कळव्यात ५०० बेडच्या रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरु



ठाणे


ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज नवीन १०० हून अधिक रुग्ण कोरोनाचे शहरात आढळत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ही संख्या १८०० च्या घरात गेली असल्याने  वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या गोडावूनच्या ठिकाणी म्हाडाच्या वतीने १ हजार बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तर मुंब्यात ५०० बेडचे आणि कळव्यात ५०० बेडसाठी जागेचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.


 जिल्हा शासकीय रुग्णालयातील देखील कोरोना बाधीत रुग्णांना उपचार सुरु आहेत. परंतु कोरोनाचा प्रार्दुभाव आता झोपडपटटी भागात अधिक होऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. परंतु तरीही रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत नाही. त्यात आता येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल अशा काळात रुग्णांचे अधिक हाल होण्याची शक्यता नाकारात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नवीन तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालये सुरु करण्यासाठी शनिवारी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या निवास्थानी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या उपस्थितीत या संदर्भात महत्वाची बैठक पार पडली.


यावेळी म्हाडाच्या वतीने वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या गोडावूनच्या ठिकाणी तब्बल १ हजार बेडचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. त्याचे नियोजन आता युध्द पातळीवर सुरु झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरात लवकर हे रुग्णालय सुरु होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


दुसरीकडे कळवा, मुंब्रा भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु मुंब्यात एकच रुग्णालय असल्याने उर्वरीत रुग्णांना ठाण्याच्या दिशेने धाव घ्यावी लागत आहेत. त्यामुळे रुग्णांना त्यांच्याच भागात उपचार मिळाल्यास ते सोईचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने आता मुंब्यात एका शाळेत ५०० बेडचे रुग्णालय उभारण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंब्यातील रुग्णांना आता जवळच उपचार घेणे शक्य होणार आहे. तिकडे कळव्यातही ५०० बेडचे रुग्णालय सुरु करण्याचा विचार सुरु आहे. परंतु या ठिकाणी जागेचा अभाव आहे, मैदानाचा विचार सुरु होता, परंतु पावसाळ्यात रुग्णांचे तेथे हाल होऊ शकतात. त्यामुळे कळव्यात इतर कुठे जागा मिळते का? याचा शोध सुरु असल्याचेही माहिती आव्हाड यांनी दिली.