वेशीबंदीचा परिणाम पाणी टंचाईवर
बदलापूर
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामीण भागातील अनेक गावांच्या वेशी गावकऱ्यांनी बंद केल्या आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव फारसा नाही तेथील निर्बंध शिथिल करण्यात आले असतानाही या ठिकाणी कोणाला येऊ देत नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. काही गावांमधील गावकऱ्यांनी वेशीबंदीसाठी आग्रह धरला असून दादागिरीचे प्रकारही केले जात आहेत. याचा फटका स्थानिक गावकऱ्यांनाच होत असल्याचे दिसून आले आहे. शहापूर आणि मुरबाड तालुक्यांत पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होऊ लागले आहे. काही गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मात्र वेशी बंदीचा फटका टँकरच्या वाहतुकीवरदेखील अडथळे उभे राहात आहेत. विहिरीत पाण्याचे टँकर रिते केल्यानंतर पुन्हा गावच्या वेशी बंद केल्या जात आहेत.
करोना संकटाचा सामना करण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असताना शहापूर आणि मुरबाड तालुक्यांत पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होऊ लागले आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाईने मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. १८ गावे आणि ३८ पाडय़ांमध्ये भीषण टंचाई होती. यंदा सध्या ५ गावे आणि २१ पाडय़ांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी ५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांनी दिली आहे.