अंबरनाथ आणि बदलापूरात जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू

अंबरनाथ आणि बदलापूरात जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू


बदलापूर


अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमधील स्थानिक दुकानदारांशी चर्चा केल्यानंतर या दोन्ही नगरपालिका क्षेत्रात दुकाने सुरू करावीत असा प्रस्ताव प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी पाठविला होता. या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिका क्षेत्रातील दुकाने शनिवारपासून (३० मे) सुरू करण्यास प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू करण्याचा प्रयोग करणारी मुंबई महानगर क्षेत्रातील आणि लाल पट्टय़ात मोडणारी ही दोन पहिली शहरे ठरणार आहेत. यात रेस्टॉरंट, पोळीभाजी केंद्र आणि हॉटेल पार्सल सेवेसाठी खुली ठेवता येतील,  


एक दिवसाआड चक्राकार पद्धतीने ही दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहतील. हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, जनरल स्टोअर, भांडी, खेळणी, बांधकाम साहित्य, शालेय साहित्य, चष्म्याची दुकाने, पिठ गिरणी, फर्निचर आणि फॅब्रिकेशनची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी. तर सोने-चांदी, कपडे, टेलर, पादत्राणे, फोटो स्टुडिओ, मोबाइल, घडय़ाळ, गॅरेज, लाँड्री, आईसक्रीम, मिठाई, बेकरी अशी दुकाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सुरू  राहतील.


शॉपिंग मॉल, दुकानकेंद्र, पानटपरी, गुटखा, तंबाखूची दुकाने, ऑम्लेट, चायनीज, पाणीपुरी, पावभाजी अशा हातगाडय़ा, न्याहारीची ठिकाणे, रसवंती बंदच राहतील. रस्त्यावर, उघडय़ावर खाद्यपदार्थ बनवण्यास बंदी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.


करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. या काळात जीवनावश्यक गोष्टींचा अपवाद वगळता सर्व गोष्टींची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी राज्यातील बहुतांश दुकानं व उद्योगधंदे बंद असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत होता. यामधून बाहेर येण्यासाठी राज्याच्या काही भागात दुकानं सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर शहरात आता जिवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.


नुकतीच शहरातील सर्व लोकप्रतिनीधी, व्यापारी संघ आणि मुख्याधिकारी दिपक पुजारी यांची बैठक झाली. या बैठकीत दुकानदारांना आपली दुकानं सुरु ठेवण्यासाठी सशर्थ परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी पालिकेने नियम आखून दिलेले असून, सोशल डिस्टन्सिंग व इतर सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं दुकानदारांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. “शासनाच्या नियमावरुन कुळगाव-बदलापूर हद्दीतील सर्व दुकानं सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी सोशल डिस्टन्सिंग व पालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचं काटेकोर पद्धतीने पालन करावं लागेल.