दैनदिन रेल्वेसेवा लवकरच सुरु होण्याची शक्यता
मुंबई
राज्यातंर्गत रेल्वे सेवा टप्याटप्याने सुरु करण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने आज जाहीर केल्याने दैनदिन रेल्वेसेवा लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील अर्थचक्राला गती देण्याच्या उद्देशाने आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत विमानसेवेला राज्य सरकारने सुरुवातीला विरोध दर्शविला होता. मात्र कालांतराने त्यास मंजूरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे विमानाने मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यासह अन्य शहरात उतरणाऱ्या विमान प्रवाशांची चाचणी, तपासणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारने त्या त्या शहराच्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांवर सोपवित त्यांची या कामासाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशामध्ये राज्यातील रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा विचार केंद्राकडून करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
तसेच या सेवा विमानसेवेबरोबरच सुरु करण्याचा विचार होता. परंतु आधी विमानसेवा सुरु केल्यानंतर रेल्वे सेवा सुरु करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे तयार केल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ही सेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता असून शहरातल्या उपनगरीय रेल्वे सेवेबाबतही निर्णय होईल अशी माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.