खाजगी रुग्णवाहीकांच्या वाढीव भाडे आकारणीवर प्रशासनाचे लक्ष
परवाना रद्द करण्याचा इशारा
ठाणे :
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका करोनाबाधित रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी परिवहन विभागाने खासगी रुग्णवाहिका महापालिकांना रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. ही व्यवस्था उपलब्ध असली तरी खासगी रुग्णवाहिकांचे चालक आणि मालक नागरिकांना पुरेशा प्रमाणात सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी आहेत. दवाखान्यात जाण्यासाठी जास्त भाडे आकारणे, संपर्क क्रमांक बंद करून ठेवणे, रुग्णाला नेण्यासाठी अनुपस्थित राहणे, अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरातील खासगी रुग्णवाहिकांचे मालक व चालक करोनाच्या काळातही रुग्णसेवा देण्यात चुकारपणा करत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्या रुग्णवाहिकांचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
कल्याण-डोंबिवलीमध्ये खासगी रुग्णवाहिका योग्य रीतीने रुग्ण वाहतूक करतात की नाही हे तपासण्यासाठी पालिकेने अभियंत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांच्याद्वारे कारवाई करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे, असे कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरातील बेताल खासगी रुग्णवाहिका चालक आणि मालकांना आवर घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा पद्धतीने कामचुकारपणा करणाऱ्या मालकांची आणि चालकांची वाहन नोंदणी रद्द करणे आणि परवाना रद्द करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे, असे ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी सांगितले.